top of page
Search

मुंबई : मणदूर-धनगरवाडा (ता. शिराळा) येथील गट नंबर 221 व 222 मधील दोनशे एकर जमिन सोसायटी सदस्यांच्या वारसांना कब्जे हक्काने त्यांच्या नावावर करावी.

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Aug 6, 2024
  • 2 min read


मुंबई : मणदूर-धनगरवाडा (ता. शिराळा) येथील गट नंबर 221 व 222 मधील दोनशे एकर जमिन सोसायटी सदस्यांच्या वारसांना कब्जे हक्काने त्यांच्या नावावर करावी. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दहा दिवसात करावी, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दिले.


आज (ता. 24) येथील मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात सकाळी साडे नऊ वाजता शिराळा तालुक्यातील मणदूर-धनगरवाडा येथील जमिनी हस्तांतरणाबाबत उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस सहकार मंत्री मा. ना. दिलीप वळसे-पाटील, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेनुगोपाळ, मी, उपविभागीय अधिकारी वाळवा श्रीनिवास अर्जुन, शिराळ्याच्या तहसीलदार शामला खोत-पाटील, धनगरवाडा येथील ग्रामस्थांचे प्रतिनिधी बाबूराव डोईफोडे हे प्रत्यक्ष उपस्थित होते तर, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, विभागीय वन अधिकारी स्नेहलता पाटील हे ‘‘व्हीडीओ कॉन्फरन्सने’’ जोडले होते.


या बैठकीत मी मणदूर-धनगरवाडा ग्रामस्थांची बाजू मांडताना म्हणालो, शिराळा तालुक्यातील मणदूर गावातील गट नंबर 221 व 222 मधील दोनशे एकर जमीन निर्वनीकरण करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 25 नोव्हेंबर 1966 रोजी विनोबाग्राम सहकारी सोसायटीच्या नावे कसण्यासाठी दिली होती. या सोसायटीचे सदस्य हे प्रामुख्याने धनगर समाजातील होते. नंतर 1975 साली सदर सोसायटी अवसायनात निघाली. त्यावेळी सदरची जमीन शासनाकडे जमा करण्यात आली. आज या जमिनीत सोसायटी सदस्यांच्या वारसांच्या वहिवाटीत असून तेथे धनगरवाडा नावाची वस्ती आहे. तेथील लोकांना अन्य कोठेही जमीन नसून दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन नाही. जमीन नावावर नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. सदरची जमीन अत्यंत दुर्गम भागात असून गट नं. 122 व 222 मधील 200 एकर जमीन सोसायटी सदस्यांच्या वारसांना कब्जे हक्काने मिळण्यासाठी त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आपण व महसूल मंत्री महोदयांच्या उपस्थितीत हा विषय मार्गी लावून त्यांची मागणी मान्य करावी, अशी आग्रही मागणी केली. त्याबाबत उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय व अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा होऊन वरील निर्णय ना. अजितदादानीं घेतला. त्यामुळे सुमारे 50 वर्षांपासूनची असलेली मणदूर-धनगरवाडा ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण झाली.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page